पिंपरी : भाजप शहराध्यक्षपदी आमदार महेश लांडगे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. माधवी नाईक यांनी आज (गुरुवारी) जाहीर केले.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपची बैठक आकुर्डी येथे आज (गुरुवारी) होत आहे. या बैठकीत आमदार लांडगे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर उषा ढोरे, माजी मंत्री विनोद तावडे, खासदार अमर साबळे, मावळते शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, उमा खापरे, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमित गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, रवी लांडगे, शैला मोळक, महेश कुलकर्णी आजी- माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे भोसरी मतदारसंघातून सलग दुसऱ्यावेळी निवडून आले आहेत. 2014 मध्ये ते अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लांडगे भाजपच्या चिन्हावर मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. आता त्यांची भाजपाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/