भारताला विश्वगुरु करण्यासाठी माहेश्वरी युवकांनी योगदान द्यावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या समाजापलीकडे जाऊन अन्य समुदायांसह राष्ट्रासाठी सातत्याने योगदान देणारा समाज म्हणून माहेश्वरी समाजाची ओळख आहे. विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या समाजातील नवउद्योजक युवकांनी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोधपूर येथे केले.

राजस्थानातील जोधपूर येथील पोलो मैदानावर ४ ते ७ जानेवारी या कालावधीत माहेश्वरी महाकुंभ हे माहेश्वरी समाजाचे आंतरराष्ट्रीय महाअधिवेशन व ग्लोबल एक्स्पो  होत आहे. आज या अधिवेशनात प्रमुख उपस्थित म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या अधिवेशनात आज लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषी राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार गजेंद्रसिंह शेखावत यांच्या मुख्य उपस्थितीत माहेश्वरी समाजातील ४२ प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला. जोधपूरचे महापौर घनश्याम ओझा, उपमहापौर देवेंद्र सालेचा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभेचे सभापती शामसुंदर सोनी, महामंत्री संदीप काबरा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

देश-विदेशातून आलेल्या माहेश्वरी समाजाच्या हजारो प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, माहेश्वरी समाजाने स्वत:च्या समाजासह अन्य समुदायांसाठी देखील व्यवस्था उभी केली आहे. लोकहितकारी कामांमध्ये अग्रेसर असलेला हा समाज दानशूर म्हणून ओळखला जातो. देशाच्या विकासामध्ये नेहमीच भरीव योगदान देणाऱ्या या समाजात उद्योजक आणि बुद्धिवंतांची संख्या मोठी आहे.

जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आपला देश येत्या काही वर्षांमध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने कूच करतो आहे. अशावेळी त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये, नोकरी मागण्याऐवजी उद्योग-व्यवसाय उभारुन रोजगार देऊ  शकणारा माहेश्वरी समाज महत्त्वाचा हातभार लावू शकतो. त्यादृष्टीने अधिवेशनात आयोजित ग्लोबल एक्स्पोचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

माहेश्वरी समाजाने युवा प्रतिभावंतांचा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांचा यावेळी सन्मान केला. हा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, ज्येष्ठांचा आदर व सन्मान करण्याची शिकवण यातून युवा पिढीला मिळाली आहे. बुजुर्गांना विसरणाऱ्या समाजाला वर्तमान असते पण भविष्य नसते. या महाअधिवेशनातून माहेश्वरी समाजाचे कर्तृत्ववान चरित्र आणि उज्ज्वल चित्र यांचे प्रतिबिंब दिसल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या अखेरीस केला.