तब्बल ४५ वर्षानंतर महिंद्राच्या जावाचा बूम sss  बूम sss  बुंगाट…  

नवी दिल्ली : वृत्तससंस्था  – बाईक वेड्या तरुणांसाठी आता एक खुशखबर आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या कंपनीची  नवीन जावा मोटरसायकल बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. भारतीय बाजारपेठेच्या गरजेनुसार व सध्याचा तरूणाईचा कल बघून महिंद्रा नवीन जावा बाजारात आणणार आहेत. पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये आनंद महिंद्रांच्या उपस्थितीत ही  मोटरसायकल बाजारात दाखल केली जाणार आहे.
जावा मोटरसायकल या मूळच्या झेक कंपनीचं पहिलं मॉडेल १९२९ साली जन्माला आलं जे ४९९ सीसीचं होतं. भारतीय बाजारपेठेच्या गरजेनुसार व सध्याचा तरूणाईचा कल बघून महिंद्रा नवीन जावा बाजारात आणणार आहेत. क्लासिक लीजंड या महिंद्रांच्या मालकिच्या कंपनीनं झेक ब्रँडच्या भारतातल्या विक्रीसाठी आवश्यक ते परवाने घेतले आहेत. मध्यप्रदेशमधल्या पिथमपूर इथल्या कारखान्यात जावाचं उत्पादन केलं जात आहे. विशेष म्हणजे जावाची स्वतंत्र ओळख जपण्यात येणार असून गाडीवर महिंद्राचा लोगो लावण्यात येणार नाही व डीलर्स वगैरे वेगळे नेमण्यात येणार आहेत. सध्या अशा प्रकारच्या हायएंड बाईक्सची मोठी चलती असून हार्ले, डुकातीसारख्या विदेशी कंपन्यांच्या मोटरसायकलनाही विशेष मागणी आहे. या पार्श्वभूमीवर एकेकाळी तरूणाईनं उचलून धरलेल्या जावाला आताचा तरूण वर्ग कसं स्वीकारतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इटलीमधल्या वरेसी इथल्या तांत्रिक केंद्रामध्ये जगातील आघाडीच्या इंजिन तज्ज्ञांबरोबर काम केल्यानंतर नवीन जावा तयार करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बाईकचं वैशिष्ट्य सांगताना आयुष्यभर साथ देईल असं नमूद करण्यात आलं आहे. इंजिनच्या एगझॉट यंत्रणेवर विशेष मेहनत घेण्यात आली असून योग्य त्या पाईपांची निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे हवा तो परिणाम साधला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
जावा मोटरसायकलचा इतिहास –
देशात प्रथम जावा मोटरसायकल १९६० मध्ये तयार करण्यात आली होती. तेव्हा कर्नाटकच्या म्हैसूर शहरात आयडियल जावा (इंडिया) लिमिटेडने याला चेकोस्लाव्हाकियाची कंपनी ‘जावा मोटर्सकडून’ परवाना घेऊन उत्पादित केले. याची सुरुवात १९२९ मध्ये झाली होती. भारतात जावाची निर्मिती १४ वर्षे झाली. १९७४ नंतर कंपनी आणि मॉडेल दोन्ही बदलले. ‘येजदी’ नावाने ती नव्याने आली. १९९६ मध्ये कंपनी बंद पडली. भारतात या दुचाकीचे उत्पादन १४ वर्षेच झाले असले तरीही या काळात जावाने ग्राहकांची मने जिंकली होती. ७० ते ८० च्या दशकापर्यंत ही मोटारसायकल रॉयल एनफिल्डची प्रमुख स्पर्धक होती. युरोपात तर आजही हिचा दबदबा कायम आहे. ही गाडी आजही तेथे प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळेच झेक रिपब्लिकमध्ये ‘ऑल न्यू जावा’ सादर झाली आहे. पूर्वी ही बाइक २ स्ट्रोक इंजिनसोबत येत होती. आता ४ स्ट्रोक इंजिनची आहे. नव्या जावामध्ये रेट्रो फिल अद्याप ठेवला आहे. जावाचा रेट्रो लुक हे त्याच्या लोकप्रियतेचे महत्वाचे कारण ठरले होते.
जावा  मोटारसायकलची वैशिष्ट्ये –
जावा ३५० आेएचसी
– इंजिन : ३९७ सीसी एअर कूल्ड , १ सिलिंडर ४ स्ट्रोक
– शक्ती : २७.३५ बीएचपी
– गिअरबॉक्स : ५ स्पीड
-कमाल वेग : १३० किमी / ताशी
– मायलेज : ३३.३ किमी / लिटर
– इंधन टाकी : १२ लिटर