‘दो पैसेवाली मीडिया’ वक्तव्यावर महुआ मोइत्रांचं ‘घुमजाव’ !

कोलकाता : वृत्तसंस्था – माध्यमांवार टीका करताना ‘दो पैसेवाली मीडिया’ असं पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी म्हटलं होतं. हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याबद्दल कोलकाता प्रेस क्लबने मोइत्रा यांना माफी मागण्यास सांगितलं होतं. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलंय की, ही एक बंद खोलीतील बैठक होती, म्हणून त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं की इथे प्रेसला का बोलवलं गेलं आहे?

मोइत्रा यांनी यासंदर्भात ट्विटरवर दिलं स्पष्टीकरण
जिल्हा युनिटच्या एका विभागाने रिपोर्टर्सना एका बंद खोलीतील बैठकीसाठी बोलवले होते. नुकत्याच पक्षात झालेल्या संघटनात्मक बदलांमुळे हा गट नाराज होता. येथे पत्रकारांना का बोलविण्यात आले आहे, याबद्दल मला कार्यकर्त्यांवर नाराजी होती. प्रेस क्लबला याऐवजी पत्रकारांना ट्रेनिंग द्यायला हवी. मोबाईल फोन हातात घेतलेला प्रत्येक व्यक्ती पत्रकार होत नसतो. ही एक बंद खोलीतील बैठक होती. तसेच मी आमच्या कार्यकर्त्यांना देखील फोन ठेवण्याची परवानगी दिलेली नव्हती.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
त्या या व्हिडीओत म्हणताना दिसतात की, “किसने यहां दो पोइसर वाली प्रेस को बुलाया है?” यांना या कार्यक्रम स्थळावरून हटवण्यात यावं. प्रेस क्लबने मात्र मोइत्रा यांच्या या वक्तव्याचा निषेध करत ते मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यांचं हे वक्तव्य निसंशय अनुचित तसेच अपमानकारक आहे. कारण लोकशाहीमध्ये एका पत्रकाराचे महत्त्व आणि त्याच्या पेशाप्रती सन्मान राखला गेला पाहिजे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोइत्रा या पक्ष कार्यकर्त्यांवर नाराज होताना दिसत आहेत.