कोण आहेत मेजर श्वेता पांडे, ज्यांनी तिरंगा फडकवण्यासाठी केली PM मोदींची मदत ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दरवर्षी पंतप्रधानांसह ध्वजारोहण करताना ध्वज अधिकारी उपस्थित असतात. यावेळी ही जबाबदारी भारतीय लष्कराच्या एक महिला अधिकारी मेजर श्वेता पांडे यांना मिळाली, ज्यांनी पीएम मोदींना ध्वज फडकवायला मदत केली. मेजर श्वेता पांडे या कोण आहेत आणि त्या इथपर्यंत कशा पोहोचल्या, हे आपण जाणून घेणार आहोत…

मेजर श्वेता पांडे यांना मार्च २०१२ मध्ये चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी (Officers Training Academy, Chennai) येथे नियुक्त करण्यात आले. त्यांचे वडील राज रतन पांडे यूपी सरकारच्या अर्थ विभागात अतिरिक्त संचालक होते. आई अमिता पांडे संस्कृत आणि हिंदीच्या प्राध्यापिका आहेत.

श्वेता पांडे यांनी मेरिटसह फर्स्ट डिव्हिजनमध्ये कॉम्प्यूटर सायन्समध्ये बीटेकचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी शाळा व महाविद्यालयीन काळात भाषण, वादविवाद आणि तयारी नसलेल्या वाद-विवादांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ७५ पदके व २५० प्रमाणपत्र मिळवली आहेत.

श्वेता पांडे यांनी जगातील सर्वात मोठी शाळा असलेल्या लखनऊमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. एवढेच नव्हे तर चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये टॅक्टिस ट्रेनिंगमध्ये टॉप करत त्यांनी गढवाल रायफल पदकही जिंकले आहे.

भारतीय सैन्याने दिली माहिती
मेजर श्वेता पांडे भारतीय सैन्याच्या ५०५ बेस वर्कशॉपमध्ये ईएमई (इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल इंजिनियर) अधिकारी आहेत. यावर्षी जूनमध्ये मॉस्को येथे झालेल्या विजय दिवस परेडमध्येही त्या भारतीय सैन्याच्या तुकडीचा भाग होत्या.