UP : प्रतापगढमध्ये मोठी दुर्घटना, वर्‍हाडाने भरलेली बोलेरो जीप ट्रकवर आदळली, 14 जणांचा मृत्यू

प्रतापगढ : उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधून मोठी बातमी आहे, येथे अपघातात 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. माणिकपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशराज इनारा येथे रात्री उशीरा लग्नावरून परतत असलेली बोलेरो कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 14 वर्‍हाडींचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ड्रायव्हर झोपेची डुलकी लागल्याने ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वर्‍हाडी नबाबगंज पोलीस ठाण्याच्या शेखपुर गावात लग्न समारंभात सहभागी होऊन घरी परतत होते. अपघातात मरण पावलेल्या 14 लोकांमध्ये 6 मुलांचा सुद्धा समावेश आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांच्या पथकाने बोलेरो गाडीला गॅस-कटरने कापून सर्व 14 लोकांचे मृतदेह बाहेर काढले. दुर्घटना इतकी भयंकर होती की, हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी पोलीस पथकाला सुमारे दोन तासांचा वेळ लागला. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टेमसाठी पाठवले आहेत.

माहितीनुसार, दुर्घटनेत मृत पावलेले 12 वर्‍हाडी कुंडा कोतवालीच्या जिगरापुर चौसा गावातील राहाणारे आहेत, तर बोलेरो चालकासह दोन लोक कुंडा परिसरातील अन्य गावातील राहणारे आहेत. दुर्घटनेची सूचना मिळाल्यानंतर एसपी घटनास्थळी पोहचले होते.

अपघातात या लोकांनी गमावला जीव
माणिकपुर परिसरात झालेल्या या अपघातात सर्व 14 वर्‍हाडींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुलांचा देखील समावेश आहे. बब्बू, दिनेश, पवन कुमार, दयाराम, अमन, रामसमुज, अंश, गौरव, नान भैया, सचिन, हिमांशु, मिथिलेश, अभिमन्यू, पारस नाथ यादव अशी मृतांशी नावे आहेत.