‘कोरोना’नंतर आता ‘बर्ड फ्लू’चं मोठं संकट; 4 राज्यात अलर्ट जारी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना महामारीच्या संकटानंतर आता बर्ड फ्लूच नावाचे मोठे संकट उभे राहिले आहे. राजस्थान, मध्य प्रदेशनंतर आता हिमाचल प्रदेश, झारखंडमध्ये या आजाराने चिंता वाढवली आहे. यामुळे येथील प्रशासन धास्तावले असून अलर्ट जारी केला आहे. हा जीवघेणा रोग असून बर्ड फ्लूचा कहर पाहून केंद्रासह राज्य सरकारनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. बर्ड फ्लू म्हणून ओळखला जाणारा हा रोग एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस एच 5 एन 1मुळे होतो, ज्याच्या विळख्यात पक्षी आल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो, हा रोग मानवांसाठीदेखील अत्यंत धोकादायक आहे.

राजस्थानात 245 कावळ्यांचा मृत्यू
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये बर्ड फ्लूच्या आगमनाने अधिकारीही धास्तावले आहेत. आतापर्यंत राज्यभरात 245 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यात झालावाडमध्ये 100, कोटामध्ये 47, बारामध्ये 72 पालीमध्ये 19 आणि जयपूरच्या जलमहलमधील 10 कावळ्यांचा समावेश आहे. कावळ्यांचा मृत्यू झाल्याने पशुसंवर्धन विभागाचे पथक तपास करण्यासाठी झालावाड येथे दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तपास पथकाने संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यासह प्रोटोकॉलनुसार सर्व मृत कावळ्यांना खड्ड्यात जाळण्यात आले. जेणेकरून या भागात संसर्ग होण्याचा धोका होऊ नये.

हिमाचल प्रदेशमध्ये 1700 पक्षांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशच्या प्रसिद्ध पोंग धरण परिसरात संशयास्पद स्थितीत 1700 स्थलांतरित पक्षांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. गुगलाडाच्या जगमोली येथे बहुतेक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तथापि, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की वेगवेगळ्या भागातील 15 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बॅक्टेरिया, पॅथोजेन आणि विषाणूजन्य अहवाल काही दिवसात उपलब्ध होतील. तोपर्यंत आम्ही बर्ड फ्लूची पुष्टी करू शकत नाही. परंतु हा फ्लू असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

झारखंडमध्येही अलर्ट
बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता झारखंड सरकारही सतर्क झालं आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यात बर्ड फ्लूने ठोठावल्यानंतर राज्य सरकारही सतर्क झाली आहे. सरकारने सर्व जिल्ह्यांमधील पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्यूविषयी पशुसंवर्धन विभागाला कळविण्यास सांगितले आहे. विसाराचा नमुने लॅबमध्ये पाठविण्यास सांगितले आहे. रांची येथील बिसरा कृषी महाविद्यालयाचे डॉक्टर सुशील प्रसाद म्हणाले की, झारखंडमध्ये आतापर्यंत बर्ड फ्लूचा एकही प्रकार आढळलेला नाही. पण शेजारच्या बंगालमधून येणारे पक्षी त्रास वाढवू शकतात.

मध्य प्रदेशातही बर्ड फ्लूचा कहर
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये जवळपास 50 कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाले आहे. तीन दिवसांपूर्वी इंदूरमध्ये 50 कावळ्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यासाठी संबंधित संस्था सतर्क आहेत.

दरम्यान हा आजार मानवासाठी देखील अत्यंत धोकादायक आहे. बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होते. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवांमध्ये प्रवेश करतो.