राज्यात 2 महत्त्वाच्या मार्गांवर 26 जानेवारी पासून मोठा बदल, 100 % FASTag प्रणालीचा होणार वापर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ११ जानेवारी २०२१ पासून फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू व मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कार, जीप व एसयुव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला ५ टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. या कॅशबॅकच्या माध्यमातून फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. फास्टॅगच्या १०० टक्के अंमलबजावणीच्या दृष्टीने महामंडळाने हा निर्णय घेतला.

दरम्यान, २६ जानेवारीपासून वेगवान व कॅशलेस प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) व यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Express Way) पथकर नाक्याच्या सर्व मार्गिकांवर १०० टक्के फास्टॅग (FASTag) प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे.

फास्टॅग मार्गिकेमध्ये विना फास्टॅग अथवा ब्लॅकलिस्टेड टॅग असलेल्या वाहनांनी प्रवेश केल्यास दुप्पट पथकर फी भरावी लागणार आहे. २६ जानेवारी २०२१ पासून वांद्रे-वरळी सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीने सज्ज असतील. ‘या दोन्ही मार्गाच्या पथकर नाक्यांवर उद्यापासून फास्टॅग धारक वाहनांना प्राधान्य राहील. मर्यादित कालावधीसाठी काही लेन हायब्रीड लेन असतील. त्या लेनमध्ये फास्टॅग नसलेले वाहनधारक रोख रक्कमेचा भरणा करु शकतात. पण त्यांना पथकर नाक्याजवळील स्टॉलवरुन फास्टॅग विकत घेऊन गाडीवर लावावा लागेल,’ असं सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितलं आहे.