PAN कार्डच्या नियमात तीन मोठे बदल ‘या’ तारखेपासून होणार लागू 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजूनही जर तुम्ही पॅन कार्ड बनवले नसेल आणि आधीच तुमचे पॅन कार्ड असेल तरी देखील ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आता पॅन कार्डच्या नियमावलीत तीन मोठे बदल करण्यात आले असून, येत्या १ एप्रिल पासून हे नियम लागू करण्यात येणार आहे.

१) पॅनकार्ड-आधार लिंक करा :

पॅनकार्ड आधारला लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१९ आहे. जर तुम्ही पॅनकार्ड आधारकार्डसोबत लिंक केले नसेल, तर तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते. आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम १३९ ए अंतर्गत ते निष्क्रिय समजलं जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळांनी आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा वाढवून ३१ मार्च २०१९ पर्यंत केली आहे. आयटी विभागानुसार, आर्थिक वर्षात २.५ लाखांहून अधिकची पैशांची उलाढाल असल्यास पॅनकार्ड काढणं गरजेचं आहे. असे लोक ३१ मे पर्यंत पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात.

२ ) QR कोड हा आता e-PAN मध्ये

नव्या स्वरूपात पॅन कार्ड-नव्या पॅन कार्डवर अर्जदाराचं नाव, त्याच्या आई-वडिलांचं नाव, जन्मतारीख आणि पॅन नंबरशिवाय QR कोडही असणार आहे. QR कोडमध्ये अर्जदाराचा फोटो आणि स्वाक्षरीबरोबरच इतर माहितीही पॅन कार्डवर उपलब्ध असणार आहे. ही माहिती डिजिटल साइंड आणि कोडेड असणार आहे. तसेच पॅन कार्ड स्कॅनिंग करूनही माहिती उपलब्ध करून घेता येणार आहे. नव्या पॅन कार्डवर फोटो, स्वाक्षरी, होलोग्राम आणि QR कोडची जागा बदलण्यात आली आहे. QR कोड हा आता e-PAN मध्येही मिळणार आहे.

QR कोड विशेष मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून स्कॅन करता येणार आहे. तसेच गुगल प्ले स्टोअरवरही ते मोबाइल अँप उपलब्ध आहे. (Keywords- Enhanced PAN QR Code Reader). परंतु QR कोड स्कॅन करण्यासाठी १२ मेगापिक्सल किंवा त्याहून अधिक चांगल्या क्लिअ‍ॅरिटीच्या कॅमेऱ्याची गरज आहे.

३) जुनं पॅन कार्डही राहणार सक्रिय

नव्या डिझाइनमधले पॅन कार्ड आल्यानंतर 7 जुलै 2018 पूर्वी जारी करण्यात आलेले पॅन कार्डही कार्यरत राहणार आहेत. नव्या डिझाइनच्या पॅन कार्डची माहिती https://www.tin-nsdl.com/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या वेबसाइटवर पॉप ऑफ एक्सेस केल्यानंतर नव्या डिझाइनच्या पॅन कार्डची सर्व माहिती मिळणार आहे.