CAA विरूध्द हिंसाचार करणार्‍या 57 आंदोलनकर्त्यांवर मोठी कारवाई, चौका-चौकात लावले होर्डिंग्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरुद्ध जाळपोळ करणार्‍यांवर लखनऊ जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. डिसेंबर 2019 मध्ये हिंसा करणाऱ्यांना चिन्हांकित करून 57 निदर्शकांचे चेहरे, त्यांची नावे व पत्ते प्रशासनाने सार्वजनिक केले आहेत.

प्रशासनाने गुरुवारी रात्री त्यांची फोटो लावलेली होर्डिंग्स त्याच भागात लावली, ज्या भागात त्यांनी तोडफोड केली होती. हजरतगंजसह अनेक प्रमुख चौकांमध्ये या चिन्हांकित केलेल्या समाजकंटकांची छायाचित्रे असलेली होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. तसेच 1,55,62,537 रुपयांच्या वसुलीसाठी आदेश जारी केला आहे.

यासंदर्भात डीएम अभिषेक प्रकाश म्हणाले की, जर या लोकांनी दंड वेळेवर भरला नाही तर त्यांच्याकडून जप्त केला जाईल. शहरातील हसनगंज, हजरतगंज, कैसरबाग आणि ठाकूरगंज भागातील 57 जणांकडून 67.46 लाख रुपयांची वसुली करण्याचेही प्रशासनाने म्हंटले आहे.