नागरिकांना दिलासा ! वीज बिलासंदर्भात मोठा निर्णय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –कोरोनामुळे राज्यातील नागरिकांना वीजबिलासंदर्भात दिलासा देण्यात आला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ज्या वीजग्राहकांकडे मीटर रीडिंगची सोय आहे. त्यांनी स्वतःच मीटर रीडिंग पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले असल्यामुळे महावितरणच्या घरगुती, व्यापारी, व्यावसायिक आणि इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च आणि एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे अपलोड करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींगचे वीजबिल प्राप्त होईल. ज्या ग्राहकांकडे रिडींग उपलब्ध नसेल अशा घरगुतीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सरासरी विजबिल पाठवण्यात येईल. त्यांचे बिल हे मागच्या काही महिन्याच्या सरासरीनुसार आकारण्यात येणार आहे.

घरातल्या विजेचे रीडिंग स्वतःच घेउन महावितरणच्या वेबसाइटवर पाठवून द्यावे, असे सांगण्यात आले आहे. महावितरणच्या कन्झ्युमर पोर्टलवरून किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरचे रीडिंग अपलोड करण्याची सोय आहे. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवण्याचे आवाहन केले आहे.