मोदींच्या मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय ! आकाश मिसाईल, 3 लाख रोजगार निर्मिती, इथेनॉल उत्पादन वाढविणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (दि.30) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत आकाश मिसाईल, इथेनॉल उत्पादन वाढवणे, तसेच 3 लाख रोजगार निर्मिती आदीबाबतचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Union Minister Prakash Javadekar) यांनी माहिती देताना सांगितले की, 7,725 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जवळपास 3 लाख रोजगार निर्मीती होणार आहे. यासाठीच्या योजनेला यावेळी मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मंत्रिमंडळाने कृष्णपट्टनम आणि तुमकुरूच्या औद्योगिक वसाहतींमध्ये तसेच नोएडामध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक केंद्राला परवानगी दिली आहे. कृष्णपट्टनम बंदरामध्ये 2139 कोटी रुपये खर्चून औद्योगिक क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. तसेच जावडेकर म्हणाले की, दोन ट्रेड कॉरिडॉर बनविण्यात येणार आहेत. यामुळे मालाची वाहतूक चांगल्या प्रकारे होईल. या कॉरिडॉरला एक्स्प्रेस वे, बंदरे आणि रेल्वेसारख्या सुविधा आहेत, त्या शहरांचाही विकास केला जाणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाने एस्टोनिया, पॅराग्वे आणि डॉनिनिकन संघराज्यामध्ये भारतीय मिशन सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

तसेच भूतान आणि भारतामध्ये झालेल्या सहकार्य करारालाही मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, इथेनॉलची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी योजनेला मंजुरी दिली आहे. देशाच्या पहिल्या पिढीच्या (1G) इथेनॉलच्या योजनेंतर्गत तांदूळ, गहू, मका, ऊस आदींपासून इथेनॉल बनविण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी केंद्राने 4,573 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.

पॅरादीप पोर्टसाठी मोदी सरकारने 3000 कोटी रुपये दिले आहेत. याद्वारे जागतिक स्तरावरील बंदर उभारले जाणार आहे. याचबरोबर डीआरडीओने बनविलेल्या आकाश मिसाईच्या विक्रीलाही परवानगी दिली आहे. ही मिसाईल भारतीय सैन्याला दिलेल्या मिसाईलपेक्षा वेगळी असणार आहे. या आकाश मिसाईलची रेंज 25 किमी आहे.