DRI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातून 19 लाखांच्या ‘बनावट’ नोटा ‘जप्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बांग्लादेशातून भारतात आणलेल्या 2 हजार व 500 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. डीआरआयच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2 हजार रुपयांच्या 386 नोटा आणि 500 रुपयांच्या 1191 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. लालू खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यात हे नेटवर्क पसरले असून याचा शोध डीआरआयकडून घेण्यात येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे चौकशी करण्यात येत असून यामध्ये आणखी अटक होण्याची व आणखी बनावट नोटा सापडण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कारवाईत 18 लाख 75 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून आरोपीने आणखी बनावट नोटा लपवून ठेवल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डीआरआयने ऑगस्ट 2017 मध्ये मुंब्रा येथून एका आरोपील अटक करून त्याच्याकडून 6 लाख 98 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. तर सप्टेंबर 2017 मध्ये सानपाडा येथून 7 लाख 36 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून एकाला अटक केली होती. तसेच ऑक्टोबर 2017 मध्ये वांद्रे कुर्ला संकुल येथून चार आरोपींना अटक करून 20 लाख 57 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी या कारवाईला दुजोरा दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/