ऑक्सिजन तुटवड्याच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार मैदानात, राज्यातील 190 कारखान्यांना दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

पुणे: पोलीसनामा ऑनलाइनः महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना आणि ऑक्सीजनचा तुटवडा भासत असताना या संकटातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. पवार यांनी राज्यातील तब्बल 190 साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती अन् पुरवठा करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत जलदगतीने कार्यवाही होण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूच्या वतीने त्यांनी साखर कारखान्यांना पत्र पाठवले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिनजचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू होत आहे. राज्यातील विविध रुग्णांना ऑक्सिजनअभावी दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागत आहे. ऑक्सिनजच्या पुरवठ्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशाखापट्टणम येथे ऑक्सिजन एक्सप्रेस देखील रवाना झाली आहे. महाराष्ट्रासाठी 110 मेट्रिक टन ऑक्सीजन घेऊन ही एक्स्प्रेस परतणार आहे. तसेच विविध ठिकाणी ऑक्सिजन प्लॅंट उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण 190 कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जे कारखाने बंद आहेत, त्यांना ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे असेही आवाहन केले आहे. पवारांच्या सूचनेनुसार राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती करत सामाजिक बांधिलकी जपली होती.