अमृतसरमध्ये रावणदहनावेळी अपघात, अनेकांचा मृत्यू 

अमृतसर : वृत्तसंस्था – रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या कार्यक्रमात अपघात घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दसऱ्याच्या सणाच्या मुहूर्तावर ही घटना घडली आहे. ऐन कार्यक्रम सुरु असताना ही घटना घडली त्यामुळे कार्यक्रमाला गालबोट लागले. पंजाबमधील अमृतसर येथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

ट्रेनने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समजत आहे. या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंजाब येथील चौडा बाजार परिसरात हा घटना घडली. ट्रेन पठाणकोटहून अमृतसरला येत होती.  या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामधून या अपघाताची भीषणता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येथे आयोजित रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अनेकजण रेल्वे रुळांवर उभे होते. त्यांना रुळावरून भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेची धडक बसली आणि हा अपघात झाला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. 50 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अाकडा वाढून 100 असू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळ-जवळ 500 ते  700 लोकांची गर्दी होती. या कार्यक्रमाची आतिषबाजी पाहण्यात लोक चांगलेच रमले होते. शिवाय आतिषबाजीचा धोका होऊ नये यासाठी लोक आपल्या जागेवरून थोडे मागे सरकले. कार्यक्रम पाहण्यात रमलेल्या लोकांना आपण रेल्वेच्या रुळावर उभे राहिलो आहोत याचे भानच नाही राहिले. त्यामुळे आलेल्या रेल्वेचा अंदाज त्यांना आलाच नाही. आतिषबाजीच्या रोषणाईमुळे तसेच त्याच्या फटाक्यांच्या आवाजामुळे रेल्वेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. भरधाव ट्रेन पटरीवर उभ्या असणाऱ्या लोकांना चिरडत निघून गेली आणि एकच अफरातफर माजली. अनेक लोक जखमी झाले आहेत त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दूरदर्शनने या संदर्भातले वृत्त दिले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मतदार संघातच ही घटना घडली. त्यामुळे या घटनेनंतर सिद्धू हाय हाय च्या घोषणाही देण्यात आल्या. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे.