राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, पंकजा मुंडेना मिळणार प्रदेशाध्यक्षपद ?

मुंबई  : पोलीसनामा ऑनालाइन – विधानसभा निवडणूका होऊन काही महिने उलटून गेले असून या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला असताना बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापन करता आली नाही. यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवून निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केले. यानंतर आता भाजपचे हायकमांड महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातल्या राजकारणाची सध्याची दिशा आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन अमित शहा यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक घटना घडल्या होत्या. यामध्ये पंकजा मुंडे या दिग्गज नेत्या पराभूत झाल्या. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. नाराजांचा एक गट तयार झाल्याची चर्चा मध्यंतरी होती. त्या पार्श्वभूमीवर काही मोठे बदल होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावण्याची शक्यता आहे. त्यांना केंद्रात जबाबदारी देऊन महाराष्ट्रात नव्या नेत्याला संधी दिली जाऊ शकते. असे झाले तर चंद्रकांत पाटील यांची विरोधीपक्ष नेते पदावर निवड होऊ शकते. आणि त्यांच्याकडे असलेले भाजप प्रदेशाध्यक्षपद पंकजा मुंडे यांच्याकडे दिले जाऊ शकते. विधानसभेत परभूत झाल्याने पंकजा मुंडे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी आपली नाराजी कार्यक्रमामधून बोलून दाखवली आहे.