पंकजा मुंडेंना धक्का, …आणखी एक भाऊ राष्ट्रवादीत !

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचे चुलत बंधू रामेश्वर मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. रामेश्वर मुंडे यांनी पंकजा यांच्यावर नाराजी व्यक्त केली. भाजपमध्ये कोणतेच काम होत नाही.

सातत्याने अन्याय होत असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे बंधु व्यंकटराव मुंडे यांचे चिरंजीव असलेले भाजपचे युवा नेते रामेश्वर मुंडे हे आत्तापर्यंत पंकजा मुंडे यांच्या पाठिशी उभे होते. मात्र, नाराजी व्यक्त करत त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का समजला जात आहे. परळी शहरातील भाजपची यंत्रणा रामेश्वर मुंडे हे पहात होते. यामुळे जवळच्या नात्यातील रामेश्‍वर मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर प्रवेश केल्याने पंकजा मुंडे व खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या सोबत आता मुंडे घराण्यातील एकही भाऊ राजकरणात सोबत राहिलेला नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची शेवटची सभा परळी शहरातील मोंढा मैदानावर संपन्न झाली. या सभेला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस टी.पी.मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे, जि.प.सदस्य अजय मुंडे, यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.