मेजर सुमन गावनी यांना UN चा ‘मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट’ पुरस्कार जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – संयुक्त राष्ट्र संघाचा मानाचा ‘मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट’ हा पुरस्कार भारतीय लष्करातील अधिकारी सुमन गावनी यांना जाहीर करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदुताला या पुरस्काराने पहिल्यांदाच सन्मानित करण्यात येणार आहे. सुमन संयुक्त राष्ट्र संघाची एक मोहीम अंतर्गत दक्षिण सुदानमध्ये तैनात होत्या. नुकतीच त्यांनी आपली ही मोहीम पूर्ण केली आहे.

सुमन गावनी यांच्यासोबत ब्राझिलच्या लष्कराच्या कमांडर कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांनादेखील ‘मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी सुमन गावनी आणि कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांच्या नावाची निवड केली. मेजर सुमन गावनी यांना 29 मे रोजी पार पडणार्‍या ऑनलाइन समारंभात या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारतीय नेतृत्वाकडून देण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय शांती रक्षक दिनानिमित्त आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमात सुमन गावनी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सुमन गावनी आणि कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो या सर्वांसाठी एक आदर्श आहेत. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून नव्या विचारांची बिजे रुजवली आणि समाजात आत्मविशासाची भावनाही वाढवली असल्याचे मत अँतोनियो गुतारेस यांनी व्यक्त केले आहे.