मध्य प्रदेश सत्तासंघर्ष : उद्यावर ढकलली काँग्रेसच्या सरकारची बहुमत चाचणी, सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस

पोलिसनामा ऑनलाईन टीम – काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशात सत्तासंघर्ष सुरू आहे. त्यामुळे आता कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी उद्यावर ढकलली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारला बहुमत चाचणीसाठी निर्देश देण्याची मागणी भाजपाने केली होती. या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने उद्यापर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्याचबरोबर कोर्टाने सरकारला नोटीसही पाठवली आहे.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर उद्या (बुधवारी) सकाळी साडे दहा वाजता सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, राज्यपाल लालजी टंडन यांनी सरकारला पत्र लिहून मंगळवारी विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, आता कोर्टाच्या निर्णयानंतर ही चाचणी उद्या होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील बंडखोर काँग्रेस आमदारांनी बंगळूरूत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, आम्ही कमलनाथ सरकारच्या कार्यपद्धतीवर नाखूश आहोत. आम्हाला कोणीही कैद करुन ठेवलेलं नाही. आम्ही सर्व आमदार सोबत आहोत.

22 आमदार या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यांपैकी केवळ सहा जणांचाच राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडून मंजूर करण्यात आला आहे. कमलनाथ सरकारमध्ये महत्वाची भुमिका बजावणारे काँग्रेसचे महत्वाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी 10 मार्च रोजी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर दोन दिवसांतचं त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, ज्योतिरादित्य यांच्या 20 समर्थकांनीही आपले राजीनामे दिले होते. यानंतर आता भाजपाने इथे सरकार स्थापण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली असून लवकरात लवकर कमलनाथ सरकारची बहुमच चाचणी घेण्याचा आग्रह धरला आहे.