पुलवामा घटना : कॅबिनेट कमेटीच्या बैठकीला सुरुवात  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीआरपीएफ वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाल्याच्या वृत्ताने देशभर खळबळ माजली आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवली पाहिजे अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सोशल नेटवर्किंग साईटसवर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली सोशल साईटवर वाहण्यात येत आहे. देशातील सर्व राजकीय नेते सेलिब्रेटींनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
कॅबिनेट कमेटीच्या बैठकीला सुरुवात
या हल्यानंतर देशभरातील नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून. या घटनेबाबत कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या हल्ल्याबाबत गृहमंत्रालयाने पीएमओला एक अहवाल सादर केला असून, पाकिस्तानमधून मसूद अजहरने हा हल्ला केल्याचं म्हटलं आहे. एनआयए, एनएसजी आणि सीएफएसएलचं विशेष पथक आज घटनास्थळी जाणार आहे. सकाळी सव्वा नऊ वाजता कॅबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटीची बैठक सुरु झाली आहे. यामध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. सोबतच गृहमंत्री राजनाथ सिंह सकाळी अधिकाऱ्यांसह श्रीनगर जाणार आहेत.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील २ जवान शहीद 

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.” दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर सर्व भारतीयांनी या हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी भावना व्यक्त केली आहे. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. सर्व राजकीय नेत्यांनीदेखील घटनेचा निषेध केला, परंतु घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र व्यक्त झाले नव्हते. खूप उशिरा मोदींनी ट्वीट करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच इतरही राजकीय व्यक्तींनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संपूर्ण  भारत जवानांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे म्हंटले आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, राज्यपाल सत्यपाल मलिक तसेच माजी संरक्षणमंत्री शरद पवार व मुलायम सिंह यादव, योगी आदित्यनाथ यांनीही हल्ल्याचा धिक्कार केला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राइक केला. पण त्यातून पाकला धडा मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता कायमस्वरूपी अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली एक घाव घालून पाकचे जे दोन तुकडे केले होते, तशीच कारवाई भारताने करायला हवी, अशीच चर्चा सुरू आहे.