‘बेळगावचा केंद्रशासित प्रदेश जरूर करा, पण आधी औरंगाबादचं संभाजीनगर तर करा’, भाजपाच्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  “महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद – संघर्ष आणि संकल्प” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (२६ जानेवारी) करण्यात आले. त्यावेळी बोलताना बेळगाव सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भाग हा केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. त्यावरुन भाजपचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे.

ट्विट करत भातखळकर म्हणाले, “बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबाद चे संभाजीनगर तर करा.. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या त्या विधानाची खिल्ली उडवली.

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीमाप्रश्नी मोठे विधान केले. बेळगाव सीमा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने केंद्र सरकारने संबंधित भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. बेळगाव म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकारने बेळगावंच नामकरण ‘बेलगाम’ करुन तेथे बेलगामपणे अत्याचार सुरु केले. त्याविरुद्ध आपण पक्षीय मतभेद विसरुन एकत्र येण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.