खाद्यतेल विक्रेत्याला सेल्समनने घातला 12 लाखांचा गंडा, FIR दाखल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय नव्याने सुरू केलेल्या एका व्यापा-याला व्यवसाय वाढीसाठी मदत करण्याचे अमिष दाखवून सेल्समनने सुमारे 12 लाख 69 हजार 835 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिडको पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून सध्या तो फरार आहे.

कृष्णा विजय सोनपेठकर (रा. अंबर हिल, जटवाडा रोड, औरंगाबाद) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी विनोद शरदराव मुळे यांनी फिर्याद दिली आहे.

सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुळे यांनी जालना येथील तेल उत्पादक कंपनीची एजन्सी घेतली आहे. कंपनीकडून आलेला माल ते शहरात विक्री करतात. त्यांनी एजन्सी घेतल्यानंतर आरोपीने त्यांना भेटून आपण कंपनीचा अधिकृत सेल्समन असल्याचे सांगितले. तुमच्या व्यवसाय वाढविण्यासाठी मदत करतो. तुम्हाला खाद्यतेलाच्या ऑर्डर मिळवून देतो, असे आरोपीने सांगितले. त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडून 5 लाख 85 हजार 825 रुपये किमतीच्या दोन ऑर्डर दिल्या. हा माल जीपमध्ये भरून तो घेऊन गेला. पैसे जमा होताच 7 दिवसांत पैसे आणून देतो, असे सांगितले. सोनपेठकर हा कंपनीचा अधिकृत सेल्समन असल्याने व मुळे यांनी कंपनी मालकाकडे खात्री केल्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास होता. त्यानंतर त्याने काही ऑर्डर दिल्या आणि त्याचे पैसे रोख दिले. त्यामुळे मुळे यांचा त्याच्यावर विश्वास होता. दरम्यान त्याने ग्रामीण भागातील अनेक दुकानदारांना मुळे यांच्याकडून तेल पाठविले. या तेलाची रक्कम तब्बल 11 लाख 34 हजार 40 रुपये झाली. मुळे यांनी पैशांसाठी तगादा लावल्यावर आरोपीने त्यांच्या खात्यात ऑनलाइन 4 लाख 49 हजार 900 रुपये जमा केले. दरम्यान त्याने धारूर येथील एका एजन्सीकडून खाद्यतेलाची ऑर्डर घेतली आणि त्यांना मुळे यांच्या खात्यावर 2 लाख रुपये जमा करायला लावले. मुळे यांनी या रकमेविषयी विचारले असता त्याने अंधारी येथील आनंद ट्रेडिंग कंपनीला यापूर्वी पाठविलेल्या मालाची ही रक्कम असल्याचे खोटे सांगितले. दरम्यान धारूरचा दुकानदार माल न मिळाल्यामुळे पोलीस घेऊन मुळे यांच्या दुकानात आला त्यावेळी आरोपीची भामटेगिरी उघड झाली. सिडको पोलीस तपास करत आहेत.