मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना फैलावर घेत फटकारलं, उध्दव ठाकरे म्हणाले – ‘तोंडावर जरा ताबा ठेवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, संजय निरूपम, संजय राऊत या नेत्यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या विधानांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना तंबी दिल्याचे समजते.

गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी एक मंत्र्यांची बैठक पार पडली यावेळी वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांनी तोंडावर ताबा ठेवावा अशा कडक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेते आणि मंत्र्यांना फटकारले. या बैठकीला महत्त्वाचे नेते आणि मंत्री उपस्थित होते.

विनाकारण सार्वजनिक वादग्रस्त विधाने टाळा. ज्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घ्या अशी वक्तव्य करू नका अशा कडक सूचना पक्षातील नेत्यांना या बैठकीत देण्यात आल्याचे समजते.

यशवंतराव गडाखांनी दिला इशारा
बंगले, मंत्रीपदे यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसपूस असल्याचे अनेकदा पहायला मिळाले होते. यावरूनच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलंच सुनावलंय. आत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भांडणं थांबवावीत. तुम्हाला सत्ता ही भांडण्यासाठी दिलेली नाही असा सल्ला गडाख यांनी एका कार्यक्रमात दिलेला होता.

गडाख पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे हे काही राजकारणी नाहीत. मी त्यांना लहान असल्यापासून ओळखतो. ते कलाकार आहेत. ही भांडणं अशीच राहिलीत तर ते कधीही राजीनामा देऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेळीच सावध व्हावे असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या भांडणामुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय. खरं तर काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला पाहिजे. त्यांनी सरकार तयार करण्याचा निर्णय घेतला नसता तर यांना फक्त तोंडाची हवा काढत बसावं लागलं असतं असंही गडाख यावेळी म्हणाले.