Video : ‘अजित पवारांना ‘त्या’ उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखे’ – आ. गोपिचंद पडळकर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भातील मागासवर्गीय नोकरी पदोन्नत्ती आरक्षण उपसमितीचे प्रमुखपद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्याच्या निर्णयावर भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी घणाघाती टीका केली आहे. अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नत्ती आरक्षण उपसमितीचे प्रमुख बनवणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखे असल्याचे म्हणत पडळकरांनी उपमुख्यमंत्री पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले की, ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. मग ते मराठा आरक्षण असो वा आता मागासवर्गियांचे पदोन्नतीमधील आऱक्षण रद्द करण्याचा निर्णय असो, सगळा सावळागोंधळ सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चेवरून नितीन राऊत आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते. एकीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे बैठकीत काही निर्णय झाला तर त्याची माहिती माध्यमांसमोर देतात. मात्र अजित पवार यांनी ही बैठक झाल्यानंतर भाष्य केलेले नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की, याबाबत स्पष्टीकरण द्या. तर दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे की मागासवर्गीय पदोन्नतील आरक्षणाचा विषय संपवला आहे. तर उच्च न्यायालयाने या विषयाला स्थगिती दिल्याचे वृत्त आले आहे. मात्र या ऑर्डरची कॉपी मिळालेली नाही. त्यामुळे पदोन्नती आरक्षणाबाबत नेमक काय घडले याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, असे पडळकर यांनी म्हटले आहे.