अश्लील व्हिडीओ बनवून धमकी देत धर्मांतर करून लावलं लग्न !

पोलीसनामा ऑनलाईन टीम  – जळगाव: चित्रपटांपेक्षा आता वेबसिरीजचे प्रमाण वाढू लागले आहे. त्याला पाहणारा प्रेक्षकही मोठ्या प्रमाणत आहे, काही दिवसांपूर्वीच आलेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजशी मिळती-जुळती एक घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नेरी दिगर (ता. जामनेर) येथे एका कथित मौलवी बाबाने नाशिक येथील महिलेस अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मांतर करुन लग्नही लावले. बाबाच्या वासनांध कृत्यांची आपबीती पीडीत महिलेने बुधवारी सोशल मीडियावर मांडली. याप्रकरणी बाबासहा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्ताफ मोहसीन मनियार उर्फ अलीबाबा (रा.नेरी दिगर ता.जामनेर) असे या कथित बाबाचे नाव आहे. त्याच्यासह ताहेर रिहासत शेख, सोहेल अंसारी (सर्व रा. मालेगांव) व श्रुती दिलीप सतडेकर (रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहे.

पीडित महिलेने सांगितल्यानुसार, २०१७ मध्ये एका महिलेने तिला अलीबाबा यांचा मोबाईल नंबर दिला. या नंबरवर संपर्क साधल्यानंतर तुमचा कौटुंबिक कलह मिटवून समाधान करून देतो, म्हणत त्याने ५० हजार रुपये मागितले.पीडितेने त्यास होकार दिला. त्यानंतर अल्ताफ हा या महिलेस मालेगाव येथून नेरी येथील आश्रमात घेऊन आला. तिथे त्याने आपणास संमोहित केले. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर बाबाने आपणास अश्लील व्हिडीओ दाखवून धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच धर्मांतर करुन लग्नही लावले आणि त्याने पहिली पत्नी व मुलगा असल्याचे लपविले. बाबा एवढ्यावरच थांबला नाही तर धमकी देत वेळोवेळी अंदाजे अडीच लाख रुपये उकळले. आपण त्याचे घर सोडून माहेरी निघून गेले. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यास जाणार त्याआधीच बाबाने आपल्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर सोहेल अन्सारी आणि एका महिलने धमकी दिली. याबाबत जामनेर पोलिसात दि. ६ ऑक्टोबर रोजी खंडणी, पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न मारहाण आणि धमकी देणे प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंबादास पाथडकर करीत आहे.

अल्ताफ मनियारने फिर्यादी महिलेसोबत लग्न केले असून २०१७ पासून ते मालेगांव येथे राहतात. २०१९ मध्ये तो १५ दिवसांसाठी नेरी येथे आला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांचे पथक माहिती घेण्यासाठी मालेगांव येथे पाठविले होते. चौकशी सुरु आहे, असे जामनेरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले.