Lockdown : संचारबंदीत पोलिसांना ‘मामा’ बनवणं आमदाराच्या जावयला भोवलं, आमदाराची कार जप्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सोलापूरात कोरोना पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात शुक्रवारी एका आमदाराच्या कारमधून फिरत पोलिसांनी ‘मामा’ बनविणे आमदाराच्या जावयाला चांगलंच अंगलट आले. पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता आमदाराच्या गाडीवर कारवाई करत कार जप्त केली.

सोलापूरमधील डॉ. आंबेडकर पार्क चौकात पोलिसांच्या नाकाबंदीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन त्यावर कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी अडविण्यात आलेल्या एका किंमती कारवर पुढे आणि मागील काचेवर विधानसभा सदस्य असे लिहण्यात आले होते आणि सोबत विधानसभेचे चित्र असलेले हिरव्या रंगाचा पास अडकविण्यात आला होता.

पोलिसांनी ही कार अडवून चौकशी केली असता कारमध्ये संबंधित आमदार नव्हते. तर आमदारांचे जावई असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कारवर कारवाई करत कार ताब्यात घेतली. दरम्यान, जावयाने आमदरांना फोन करून घटनेची माहिती देत मोबाइल पोलिसांकडे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी यावेळी आमदारांशी मोबाइलवर बोलण्यास नकार देत गाडीवर करावाई करून आपले कर्तव्य पार पाडले.