भारतासोबत विनाकारण ‘पंगा’ घेणारे मलेशियाचे PM महातीर मोहम्मद यांचा राजीनामा

क्वालालांपूर : वृत्तसंस्था – काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आणि सीएए वरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद (Mahathir bin Mohamad) यांनी कायमच भारतविरोधी भूमिका घेतली होती. त्यानंतर भारतानेही मलेशियाकडून पाम ऑईल खरेदी करण्यावर बंदी घातली होती. आता पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका टीव्ही चॅनेलच्या माहितीनुसार महातीर यांनी आपला राजीनामा तिथल्या राजाकडे सुपूर्द केला आहे. महातीर मोहम्मद 10 मे 2018 रोजी पंतप्रधान झाले होते.

एका वृत्तवाहीनीच्या माहितीनुसार, महातीर यांचा पक्ष ‘बेरास्तू’ने (BERSATU) सरकारशी असलेली आघाडी तोडली आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 94 वर्षाचे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते असलेल्या महातीर यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यापासून मलेशियाच्या राजकारणात अस्थिरता आली होती. त्यानंतर आता महातीर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.

यामुळे दिला राजीनामा
महातीर आणि अन्वर इब्राहिम यांनी मिळून 2018 मध्ये सरकार स्थापन केले होते. परंतु अन्वर यांनी महातीर यांच्या पक्षावर फसवणुकीचा आरोप लावला आहे. महातीर यांनी आम्हाला धोका देत युनायटेड मलायस नॅशनल ऑर्गनायझेशन बरोबर हातमिळवणी केला असल्याचे अन्वर यांचे म्हणणे आहे.

राजकारणातील चाणाक्ष्य आहेत महातीर
महातीर यांची मलेशियाच्या राजकारणावर मजबूत पकड होती. 1981 पासून 2003 पर्यंत पंतप्रधान राहिले होते. त्यानंतर 2018 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी सत्ता सांभाळली होती. 2018 मध्ये त्यांनी नझीब रझाक यांचा पराभव केला होता. रझाक यांच्यावर त्यांवेळी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.