पाकिस्तानच्या नादाला लागून भारताविरूध्द गरळ ओकणार्‍या ‘या’ पंतप्रधानांना ‘बुरे दिन’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – काश्मीरच्या मुद्द्यावर भारताची साथ सोडणारे मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांना मोठा झटका बसला आहे. अगोदर त्यांची खुर्ची गेली आणि आता त्यांना त्यांच्या पक्षातूनच काढून टाकण्यात आले आहे. महातिर मोहम्मद यांना त्यांच्या पक्षाने पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दोषी ठरवत बाहेरचा रस्ता दाखवला.

काश्मीरचा मुद्दा आणि नागरिकता दुरूस्ती कायद्यावर भारतावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आलेले मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांना संसदीय सत्रात विरोधकांसोबत बसल्यामुळे पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. महातिर यांना ज्या पक्षातून काढून टाकण्यात आले आहे, त्या पक्षाचे ते सह-संस्थापक होते.

गुरुवारी महातिर यांना लिहिलेल्या पत्रात प्रीबूमी बेरसतु मलेशिया (पीपीबीएम) चे कार्यकारी सचिव मुहम्मद सुहैमी याहया यांनी म्हटले की, माजी पंतप्रधानांचे सदस्यत्व, पक्षाच्या घटनेचे उल्लंघन केल्याने रद्द केले जात आहे. भारतासोबत तणाव निर्माण झाल्यानंतर याच वर्षी फेब्रुवारीमध्ये महातिर मोहम्मद यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर माजी गृहमंत्री मोहिउद्दीन यासीन मलेशियाचे पंतप्रधान झाले.

महातिर मोहम्मद यांनी भारतविरोधी वक्तव्य केल्यानंतर भारत आणि मलेशियामधील संबंध बिघडले होते. भारताने मलेशियाच्या विरोधात अनेक प्रतिबंध लावले होते. भारतात मलेशियातून पामतेलाच्या आयातीवर बंदी घातली होती. परंतु, मोहिउद्दीन यासीन पंतप्रधान बनल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध पुन्हा सुधारले. त्यानंतर भारताने पामतेलावरील बंदी हटवली.

मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी मागच्या वर्षी संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या भाषणात भारतावर काश्मीरवर बळजबरीने कब्जा केल्याचा आरोप केला होता. भारत महातिर मोहम्मद यांच्या या वक्तव्याने नाराज होता. महातिर मोहम्मद यांनी काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने विरोध दर्शवला होता.

एवढेच नव्हे महातिर मोहम्मद यांनी एनआरसी-सीएएवरून सुद्धा भारतावर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, मला हे पाहून दु:ख वाटते की, धर्मनिरपेक्ष होण्याचा दावा करणारा भारत मुस्लिमांना नागरिकत्वापासून वंचित ठेवत आहे. या कायद्यामुळे अगोदरच लोक मरत असतील, तर तो लागू करण्याची गरज काय. सुमारे 70 वर्षांपासून सर्व एक नागरिक म्हणून सोबत राहात आहेत.

यानंतर भारताने प्रथम महातिर यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आणि त्यांनी भारताच्या अंतर्गत प्रकरणात बोलू नये असे म्हटले. नंतर भारताने मलेशियाच्या पामतेल आयातीवर बंदी घातली.