मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खासदार झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांचा ‘यु-टर्न’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि नवनियुक्त खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना काल एनआयए कोर्टात हजर व्हायचे होते. मात्र आजारपणाचे नाटक करून त्यांनी  कोर्टात जाणे टाळल्यानंतर आज त्यांना मुंबईच्या एनआयए कोर्टात आणण्यात आले. मात्र यावेळी न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी असे काही उत्तर दिले कि, सगळेच जण चक्रावून गेले. २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबईतील विशेष न्यायालयात उपस्थित रहावे, असा आदेश त्यांना देण्यात आला होता. सुरुवातीला मात्र त्या हजर राहणार नसल्याचं पत्राद्वारे कळवलं होतं. मात्र त्यांची ही विनंती विशेष न्यायालयानं फेटाळून लावल्यामुळे आज त्यांना कोर्टात हजर राहावे लागले होते.

सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर न्यायाधीशांनी साध्वीला विचारले कि, २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तुम्हाला काय म्हणायचे आहे, यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले कि, मला याबद्दल काही माहित नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला कि, किती जणांचा आतापर्यंत जबाब झाला आहे, यावर साध्वी म्हणाल्या याविषयी मला काही माहिती नाही. त्यानंतर बाकी आरोपींना प्रश्न विचारल्यानंतर त्यांना बसण्यासाठी खुर्ची दिली असता त्यांनी बसण्यास नकार दिला.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्यप्रदेशातील भोपाळमधून भाजपच्या तिकिटावर त्या निवडून आल्या आहेत.