मालेगाव : महापौरांचे बंधु खलिल शेख यांच्यावर गोळीबार

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाईन  – माजी स्थायी समिती सभापती आणि विद्यमान महापौरांचे बंधु खलिल शेख यांच्यावर रविवारी पहाटे दीड वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे मालेगावात एकच खळबळ माजली असून या गोळीबारात शेख हे थोडक्यात बचावले आहेत.

खलिल शेख हे शहरातील उद्याने शिवारातील विद्युत उपकेंद्राजवळून पहाटे दीडच्या सुमारास जात असताना हल्लेखोरांनी अचानक त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला चाटून गेली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. बरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. गोळी हाताला चाटून गेल्याने ते थोडक्यात बचावले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती समजताच काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर एकच गर्दी केली होती. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी रुग्णालयात पहाटे भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.

खलिल शेख हे मनपाचे विद्यमान महापौर रशीद शेख यांचे धाकटे बंधू तर मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख यांचे काका आहेत. याप्रकरणी रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मालेगावात पुन्हा गुन्हेगारी वाढू लागली असल्याचे दिसून येत असून गेल्या २८ सप्टेंबरला कुख्यात गुंड देसीदादा याची हत्या करण्यात आली होती.