दिलासादायक ! मालेगावात ‘कोरोना’बाधित 213 रूग्ण झाले बरे, दिला ‘डिस्चार्ज’

पोलिसनामा ऑनलाईन – मालेगाव शहरात झपाट्याने वाढणारा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वेगाने कमी होत आहे. पॉझिटिव्ह असूनही 10 दिवसांत कुठलीही लक्षणे आढळून न आलेल्या 213 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यमध्ये शहरातील 205 आणि दाभाडीच्या 8 रुग्णांचा समावेश आहे. पुढील सात दिवस हे रुग्ण होम आयसोलेशन राहणार आहेत. आता रोज अशा प्रकारच्या रुग्णांना घरी सोडले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव शहरात आत्तापर्यंत 560 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासन व नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र, शासनाच्या नवीन डिस्चार्ज पॉलिसीमुळे बाधित रुग्णांच्या घटणार्‍या संख्येने काहीसा दिलासा मिळला आहे. बाधित आढळलेल्या बर्‍याच रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाही. तरीही अशा रुग्णांवर उपचार करून दहा दिवस देखरेखीखाली ठेवले जात आहे. या 10 दिवसांत ताप, खोकला,सर्दी आदी लक्षणे नसल्यास या रुग्णांना घरी सोडले जात आहे. ज्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यात मन्सूरा हॉस्पिटल 24, फरानी हॉस्पिटल 17 व म्हाडा कॉलनी कोविड सेंटरच्या 21 रुग्णांना समावेश आहे. घरी सोडलेल्या रुग्णांना सात दिवस होम आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. या काळात ते घराबाहेर पडणार नाही यासंदर्भात त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आले आहे.