ममता बॅनर्जी मतदारांना म्हणाल्या, ‘पैसे घ्या…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी तृणमूल काँग्रेससह भाजपकडूनही प्रयत्न केले जात आहे. त्यावर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधान केले. ‘सुकमामध्ये 21 जवान शहीद झाले. पण सर्व भाजपचे नेते कोट्यवधी रुपये घेऊन पश्चिम बंगालमधून कुठेही गेले नाहीत. कारण निवडणुकांच्या आधी पैसे देण्याचे त्यांनी वचन दिले आहे. म्हणून पैसे घ्या आणि त्यांना मत देऊ नका’, असे त्या म्हणाल्या.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यानुसार, 8 टप्प्यांत मतदान घेतले जात आहे. ममता बॅनर्जी विरूद्ध भाजप हीच प्रमुख लढत दिसत आहे. एका प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी मन, बुद्धी आणि लोकांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. गुंडगिरी करून तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही. किती लोकांना तुम्ही घाबरवाल? काही दिवसांपूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा इथे आले. तेव्हा त्यांच्या बैठकीला कोणीही आले नाही. मग ते दिल्लीला गेले आणि बैठक घेतली. सीआरपीएफला इथे येऊन भाजपाच्या गुंडांच्या मदतीने बूथ ताब्यात घेण्याचे आदेश दिले’.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, ‘सुकमामध्ये 21 जवान शहीद झाले. पण सर्व भाजपचे नेते कोट्यवधी रुपये घेऊन पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांनी लोकांना निवडणुकांच्या आधी पैसे देण्याचे वचन दिले आहे. पैसे घ्या आणि त्यांना मत देऊ नका. हा तुमचाच पैसा आहे. ते किती खोटे बोलतात ते तुम्ही पाहिले आहे. 15 लाखांपैकी एकही पैसा लोकांच्या खात्यात जमा झालेला नाही’.