बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, ममता बॅनर्जींचा भाजपावर निशाणा

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संथाल नर्तक बसंती हेंब्रम यांचा सत्कार करताना चक्क कलाकारांबरोबर नृत्य करीत ताल धरला. बांगला संगीत मेळा २०२० चे उद्घाटन करताना त्यांनी बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असे म्हणत भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला.

या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी संगीतकार, गायक आणि नर्तक तसेच अनेक लोक कलावंतांचा गौरव केला. संथाल नर्तक बसंती हेंब्रम यांचा सत्कार करताना त्यांना नृत्य करण्याचा आग्रह कलावंतांनी केला. त्यावर त्यांनी इतरांबरोबर सामील होत नृत्यही केले.

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, संगीताला कोणत्याही सीमा नाहीत. संगीत मंच कधीही विभाजनावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही त्यात फुट पाडण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही.

बंगालला गुजरातचे विकासाचे मॉडेल लागू करण्याच्या भाजपाच्या वारंवार केल्या जाणार्‍या दाव्याची दखल घेत बंगालला कधीही गुजरातमध्ये बदल होऊ देणार नाही. त्या म्हणाल्या, नेताजींनी आम्हाला जय हिंद दिले जे जगप्रसिद्ध आहे. बंकिमचंद्र यांनी वंदे मातरम आणि रवींद्रनाथ टागोर यांनी आम्हाला राष्ट्रगीत दिले. हे सर्व बंगालच्या मातीतून आले. बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक दिवस, संपूर्ण जग बंगालला अभिवादन करेल ,असा माझा विश्वास आहे. नोबेल पारितोषिकापासून ते सर्व काही बंगालमधील आहे. आम्ही बंगालला गुजरामध्ये बदलू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.