West Bengal : पुन्हा TMC चा गड ममता बॅनर्जी राखणार, सर्व्हेचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. पण आतापासूनच येथे निवडणूकीचे वारे वाहत असून संपूर्ण देशाचे लक्ष येथे होणा-या निवडणुकीकडे लागले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा यांचा गड वाचवण्याकडे कल आहे. तर दुसरीकडे भाजपने येथे बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान सी-व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेत ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा येईल, असा दावा केला आहे.

यंदा पश्चिम बंगालसह चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप कोणत्याही राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. तरीही आतापासूनच जनतेचा कौल घेण्याकडे ओढा वाढला आहे. सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार, बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसला 2 टक्के आणि 53 जागांचे नुकसान होऊ शकते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत टीएमसीला 43 टक्के मते मिळतील. तर,158 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. भाजपला 37.5 टक्के मते मिळतील. तर,102 जागांवर विजय मिळवून भाजप तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त केला आहे. काँग्रेसला निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, काँग्रेसला 30 जागा मिळतील, असेही सर्व्हेत म्हटले आहे.

ममता बॅनर्जी सर्वाधिक पसंती असलेल्या मुख्यमंत्री उमेदवार म्हणून पुढे येतील. मुख्यमंत्री म्हणून बॅनर्जी यांना 48.8 टक्के नागरिकांची पसंती दर्शवली आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष दुसऱ्या आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पश्चिम बंगालमधील 37.17 नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले आहे.