शपथ दिल्यानंतर छोटी बहिण म्हणून राज्यपालांनी आठवून दिला ‘राजधर्म’; ममता बॅनर्जी म्हणाल्या…

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदासाठी तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता बॅनर्जी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

देशभरात कोरोना व्हायरसचे संकट मोठे आहे. त्यामुळे शपथविधी सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आज फक्त ममता बॅनर्जी यांनीच शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याने शपथ घेतली नाही. त्यावेळी व्यासपीठावर राज्यपाल जगदीप धनखड आणि ममता बॅनर्जी हे दोघेच होते. ममता बॅनर्जी यांनी कोरोनाविरोधात आपली लढाई सुरुच राहिल असे सांगितले. हिंसाची घटना सहन केली जाणार नाही, असे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांच्यानंतर राज्यपाल धनखड यांनीही निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. ममता बॅनर्जी यांना छोटी बहिण म्हणत राज्यपालांनी कायदा व्यवस्थेबाबत भाष्य केले. राज्यपालांनी म्हटले, की ‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य असावे. आम्हाला आशा आहे, की ममता बॅनर्जी संविधाननुसार कामकाज करतील’.

राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर ममता बॅनर्जी यांनीही उत्तर दिले. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला निशाण्यावर धरले. आत्तापर्यंत सगळंकाही निवडणूक आयोगाच्या अधीन होते. निवडणूक आयोगाने अनेक अधिकाऱ्यांना बदलले होते. मी आत्ताच शपथ घेतली आहे. लवकरच व्यवस्था करेन, असे त्या म्हणाल्या.