#Pulwamaterrorattack : निवडणुकीच्या तोंडावर पुलवामात हल्ला कसा झाला ?

कोलकत्ता : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याविषयी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी धक्कादायक विधान केलं आहे. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा निवडणुकीपूर्वी कसा झाला ? असा सवाल त्यांनी केला आहे.

पुलवामासंदर्भात गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानंतर देखील त्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं ? सीआरपीएफच्या जवानांना मोठ्या संख्येनं का रस्त्याच्या मार्गानं पाठवलं जात होतं ? गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतरही सीआरपीएफच्या ७८ वाहनांना एकत्र का पाठवण्यात आलं, जवानांना विमानाने का नाही पाठवलं गेलं ? यामध्ये असा किती पैसा खर्च होणार होता. ज्या लोकांनी हा हल्ला घडवून आणला त्यांच्यावर सरकारने कारवाई करायला हवी. जर यावरुन भाजपा-आरएसएसच्या लोकांनी दंगली घडवण्याचा प्रयत्न केला तर देश त्यांना कधीही माफ करणार नाही असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी मात्र सरकारला धारेवर धरले आहे. तसेच माझा मोबाईल फोन टॅप केला जातो, असे मला गुप्तचर यंत्रणांकडून समजले असल्याचा आरोपही ममतांनी केला.

विरोधक सरकारच्या पाठीशी : राहुल गांधी
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर विरोधक सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचं सांगितलं होतं. या दहशतवादी हल्ल्याचं कोणतंही राजकारण होऊ नये असं देखील राहुल यांनी म्हटलं होतं.