West Bengal Election : ममता बॅनर्जी म्हणाल्या – ‘मी गळा कापुन घेईन पण भाजपापुढं झुकणार नाही’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पश्चिम बंगाल (West Bengal) च्या कोलकाता येथे 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती समारंभादरम्यान झालेल्या घोषणाबाजीच्या घटनेवर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्र‍तिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी हुगळी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना भाजपावर या मुद्द्यासंदर्भात जोरदार हल्ला चढविला. यावेळी त्या म्हणाल्या की, “मी भाजपासमोर मान झुकवण्याऐवजी माझा गळा कापणे पसंत करेन.”

दरम्यान 23 जानेवारीला व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी जयंती कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला तेव्हा तेथे उपस्थित जमावाने जय श्री राम यांचा जयघोष केला होता. यावर ममता बॅनर्जी सोमवारी म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर त्या लोकांनी माझा अपमान केला आहे. मी बंदुकांवर नाही तर राजकारणावर विश्वास ठेवते. भाजपाने नेताजी आणि बंगालचा अपमान केला आहे.”

 

 

 

 

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “जर तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयघोष केला असता तर मी तुम्हाला सलाम केला असता. परंतु आपण मला बंदुकीच्या टोकावर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर मला प्रत्युत्तर कसे द्यावे हे माहित आहे.”