‘…तर मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन’ : ममता बॅनर्जी

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर्षी यावर्षी राज्यात दुर्गा पूजा होणार नाही अशी अफवा पसरवली जात आहे असा आरोप केला आहे. पश्चिम बंगाल सरकारनं यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं सिद्ध केलं तर मी लोकांसमोर 100 उठाबशा काढेन असं थेट आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. मंगळवारी पोलीस दिनाच्या निमित्तानं व्हिडीओ कॉन्फरिंसिंगच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी ममता बोलत होत्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “एक राजकीय पक्ष दुर्गा पूजेसंबंधी अफवा पसरवत आहे. यासंबंधी अद्याप आपण कोणतीही बैठक घेतली नाही. पश्चिम बंगाल सरकारनं यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं सिद्ध करून दाखवा मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन.” असं त्या म्हणाल्या. काही बनावट आयटी पेजेस दुर्गा पेजेस संबंधी चुकीची माहिती पसरवत असल्याचं” देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

‘जाणूनबुजून अफवा पसरवण्याचा प्रयत्न’
ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणाल्या, “जाणूनबुजून अफवा पसरवणाऱ्या अशा लोकांना शोधा आणि त्यांना कान पकडून उठाबशा काढायला लावा असं मी पोलिसांना सांगितलं आहे. जातीय सलोखा बिघडवण्यासाठीच हे सगळं केलं जात आहे. ज्यांनी कधीही दुर्गा पूजा, हनुमानाची पूजा केलेली नाही तो लोक पूजेबद्दल बोलत आहेत.” असंही त्या म्हणाल्या आहेत.