ममतांनी केला डॅमेज कंट्रोल, नाराजी दूर ! शुभेंदू अधिकारी तृणमूलमध्येच राहणार

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन – बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने आता लक्ष्य पश्चिम बंगालवर केंद्रित केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. तेथील वातावरण आता चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. एवढेच नाही तर सरकारमधील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या वावड्याही होत्या. एकूणच ममता सरकार डॅमेज होणार असे चित्र निर्माण झाली होते. मात्र, ममतांनी पहिला डॅमेज कंट्रोल केला आहे. शुभेंदू अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन नाराजी दूर केली आहे. त्यामुळे ते आता तृणमूलमध्येच राहणार आहेत.

पश्चिम बंगालच्या राजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. पण गेल्या वर्षभरापासून कॅबिनेटच्या बैठकांना ते अनुपस्थित राहत होते. त्यानंतर ते राजीनामा देणार असल्याचीही चर्चा होती. आपल्या राजीनामापत्रात शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मी माझ्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी राज्यपालांनाही याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. तदनंतर ते भाजपमध्ये दाखल होणार अशी चर्चा होती.

शुभेंदू हे पक्षाचे मोठे नेते आहेत आणि संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. आपल्या संघटनात्मक कौशल्यामुळे शुभेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व म्हणून समोर आले होते. दोन वेळा खासदार राहिलेले शुभेंदू हे नंदिग्राममधील आंदोलनामुळे चर्चेत आले होते. या आंदोलनाने बंगालच्या राजकारणाची दिशा बदलली होती. त्यानंतर २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी प. बंगालची सत्ता हस्तगत केली होती. यामुळे त्यांचे पक्ष सोडून जाणे ममता बॅनर्जींना परवडणारे नव्हते. यामुळे ममता यांच्या तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांनी मंगळवारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. उत्तर कोलकातामध्ये एका ठिकाणी ही बैठक दोन तास चालली. या बैठकीला सौगत रॉय आणि सुदीप बंदोपाध्यायदेखील हजर होते. तृणमूलने केलेल्या दाव्यानुसार अधिकारी यांची समजूत घालण्यात आली आहे. त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. त्यांचे काही मुद्दे होते, ते समोरासमोर सोडविण्याची गरज होती. त्यामुळे ही बैठक घेण्यात आली. त्यांची नाराजी दूर झाली आहे.