ममता नव्हे ‘तालिबानी’ दिदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. एकीकडे भाजपाला पुन्हा सत्तेत यायचे आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष महाआघाडी करून भाजपला सत्तेतून काढू पाहतायत. काही दिवसांपूर्वीच कोलकत्यात ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार ,हार्दिक पटेल, अखिलेश यादव यांनी महाआघाडीचे शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर बंगालमधील पूर्व मिदनापूर येथून अमित शाहंच्या रॅलीतून परत येत असताना भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यावरूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘तालिबानी’ दिदी सारख्या वागत आहेत, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्याप्रकारे वाहनांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांना आग लावण्यात आली. यावरून पश्चिम बंगालमधील सद्यस्थिती दिसून येते. हा ममता बॅनर्जींचा खरा चेहरा आहे, असे पात्रा म्हणाले. ही कुठल्या प्रकारची वागणूक आहे. तुम्ही ‘तालिबानी’ दिदी सारख्या वागत आहात, असेही पात्रा म्हणाले. भाजपला राज्यात मिळणारा प्रतिसाद बघून ममता घाबरल्या असल्याचेही पात्रा म्हणाले.

बंगालमध्ये ममतांच्या नेतृत्वाखाली तालिबान्यांचे प्रस्थ वाढत आहे. आजच्या घटनेने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याचेही ते म्हणाले. तुम्ही बंगालमध्ये सीबीआयला येऊ देत नाही. तुम्ही राज्यात भाजपच्या नेत्यांना रॅली करू देत नाही. तुम्ही लष्कर आणि बीएसएफवर शंका घेता. तुम्ही राज्यात कुठल्याही लोकशाही पद्धतीनुसार काम करत नाही. ही लोकशाही आहे का?, असा सवालही पात्रा यांनी यावेळी उपस्थित केला.