Thane : सुप्रसिद्ध ‘मामलेदार मिसळ’चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे ‘मिसळसम्राट’ अशी ख्याती असलेले सुप्रसिद्ध मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर (वय 84) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि. 1) निधन झाले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मामलेदार मिसळ हा ठाण्याचा ब्रँड त्यांनी निर्माण केला होता.

‘मामलेदार मिसळी’ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक ओळख मिळवून देण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. मूळचे कर्नाटकचे असलेल्या मुर्डेश्वर यांनी ठाण्यात 1946 साली तहसील कार्यालयाबाहेर ‘मामलेदार मिसळ’ सुरू केली होती. त्यानंतर आज ‘मामलेदार मिसळ’ हा एक ब्रँड झाला आहे. ठाण्यातील खाद्य ते मिष्टान्न विक्रेता संघाचे 27 वर्ष ते खजिनदार होते.

लक्ष्मण मुर्डेश्वर त्यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांच्यासह मुंबईत आले तेव्हा ते केवळ 4 वर्षांचे होते. ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी उद्योग करावा, या हेतून आजचे तहसीलदार कार्यालय म्हणजेच त्यावेळच्या मामलेदार कचेरीच्या बाहेरची जागा शासनाकडून भाड्याने घेतली आणि तिथे कँटीन सुरू केली होती. मात्र काही वर्षांनी म्हणजे 1952 साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर आली. तेव्हापासून ते कँटीन चालवत होते. मामलेदार मिसळीला आज 70 वर्षांहून अधिक काळ झाला आहे.

मामलेदार मिसळीला कलाकार, राजकारण्याची पसंती
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘मामलेदार मिसळी’चे चाहते आहेत. गेल्याच वर्षी कल्याण आणि भिवंडीमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्यानंतर मुंबईच्या दिशेने परतताना राज ठाकरे यांनी मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला होता. यावेळी अमित ठाकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी दुकानाबाहेर राज समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. राज यांच्यासोबतच नारायण राणे देखील ठाण्यात आले की मामलेदार मिसळ आवर्जुन मागवून घेतात. इतकेच नव्हे, तर विधीमंडळाच्या अधिवेशनातही नारायण राणे 500 ते 600 प्लेट मिसळ थेट मुंबईला मागवून घ्यायचे आणि सर्व मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना मेजवानी द्यायचे. अनेक कलाकार मंडळीही देखील मामलेदार मिसळ चाखण्यासाठी येत असतात. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये प्रयोगासाठी येत असताना ‘मामलेदार मिसळ’चा आस्वाद घेण्यासाठी अनेक कलाकार येथे आवर्जुन येत असतात.