एअर स्टाईकवर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला संशय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पाक व्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथे केलेल्या एअर स्टाईकमध्ये ३५० दहशतवादी ठार झाले आहेत. याबाबत संशय व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कार्यवाहीचे सरकारने पुरावे सादर करावे अशी मागणी केली आहे. देशवासीयांनी कशावरून मानावे कि ३५० दहशतवादी भारतीय वायुसेनेच्या हल्ल्यात ठार झाले आहेत असे ममता बॅनर्जी यांनी म्हणले आहे.

भारतीय सेने बद्दल मला आदर आहे मात्र कशावरून मानावे कि भारताने केलेल्या कार्यवाहीत जैश-ए-महम्मदचे ३५० दहशतवादी ठार झाले आहेत असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेल्या पुराव्याच्या मागणीने राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी आपले वक्तव्य लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदे नंतर दिले आहे. त्यामुळे त्यांची मागणी हि व्यवहारी असल्याचे देखील राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

दरम्यान भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भारताच्या लष्करी कार्यवाही बद्दल माहिती दिली आहे. पाकिस्तानात असणारे दहशतवादी तळ पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद संपवण्यासाठी ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत नष्ट करत राहणार असे भारतीय लष्कराने सांगितले आहे. तसेच एअर स्टाईकचे पुरावे कधी उघड करायचे या बाबतचे निर्णय केंद्र सरकार घेईल असे तिन्ही दलाच्या प्रमुखांकडून सांगण्यात आले.