ममता बॅनर्जींचा ‘गनिमी कावा’ ; ‘संघाशी’ लढण्यासाठी ‘हे’ २ पथक ‘अ‍ॅक्टीव्ह’

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मिळालेल्या झटक्यानंर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच रणनीती आखणे सुरु केली आहे. यासाठी ममता बॅनर्जी यांनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी मुकाबला करण्यासाठी पक्षात दोन नव्या पथकांची स्थापना केली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृतानुसार, ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी सदरील बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ‘जय हिंद वाहिनी’ आणि ‘बंग जननी वाहिनी’ या दोन नव्या पथकांची स्थापना करण्यात आली असल्याचे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. यापैकी जय हिंद वाहिनीच्या अध्यक्षपदी आणि संयोजक पदावर ममतांनी आपले बंधू कार्तिक बॅनर्जी व गणेश बॅनर्जी यांची नियुक्ती केली. तर बंग जननी वाहिनी या पथकाचे अध्यक्षपद तृणमूलच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्याकडे देण्यात आले आहे.

यावेळी ममतांनी म्हटले आहे की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आणि समाजकंटक प्रवृत्तीच्या लोकांनी भाजपात प्रवेश केला आहे. हे लोक राज्यात अस्थिरता पसरवत आहेत. त्यामुळे अशा लोकांची यादी तयार करण्यात यावी, असा आदेशही ममता यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव हा स्थायी स्वरुपाचा आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हंटले आहे.