ममता बॅनर्जी या राणी लक्ष्मीबाई नाहीतर पुतना आहेत !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आणि भाजपचा वाद हा सर्वश्रूत आहे. मागील काही दिवसांपासून भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जी या पुतना आहेत. तर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नवाचा आधार घेत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर आक्षेपार्ह टीकाही केली आहे. ते पत्रकांरांशी बोलत होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आधुनिक काळातील झाशीची राणी आहेत. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यासाठी एक शिवी आहे. ममता बॅनर्जी या पुतना असू शकतात, त्या झाशीची राणी नाही बनू शकत. ज्यांनी पूर्ण पश्चिम बंगाल उद्ध्वस्त केले त्या किम जोंग असू शकतात. त्या आपल्या विरुद्ध बोलणाऱ्यांची हत्या करू शकतात. ममता यांच्यात राणी लक्ष्मीबाई आणि राणी पद्मावती होण्याची ताकद नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

तसंच गिरीराज यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या भारतातील घुसखोरीवरूनही ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ममता बॅनर्जी रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या घुसखोरीला समर्थन देतात. भारताला तोडण्याच्या तसंच हिंदूंना काढण्याच्या गप्पा करतात. त्या झाशीची राणी नाही होऊ शकत. झाशीच्या राणीने हिंदूस्थानाला वाचवण्यासाठी लढाई लढली होती. तर ममता या हिंदूस्थानाला तोडण्यासाठी लढत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, पुतना ही कृष्णलीलांमधील एक राक्षसी आहे. त्यामुळे आता पुतनाशी केलेल्या या तुलनेवर ममता बॅनर्जी कशी प्रतिक्रिया देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.