कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा टीएमसीचा झेंडा फडकला आहे. बंगाल निवडणुकीतील ममता बॅनर्जींच्या विजयाने विरोधी पक्षांना ऑक्सीजन मिळाला असल्याचे दिसत आहे. अनेक राज्यांत भाजपाविरोधी पक्षाची सत्ता गेल्यानंतर अंदाज वर्तवण्यात येत होता की, भाजपा यावेळी बंगालची सत्ता मिळवू शकते, परंतु जनतेने दीदींकडे पुन्हा एकदा सत्ता सोपवली आहे. ममता यांच्या या विजयाने त्यांची राजकीय उंची वाढवली असून यासोबतच विरोधी पक्षांच्या सर्वसंमत नेत्या म्हणून त्यांचा दावा मजबूत झाला आहे.
तिसर्यांदा पश्चिम बंगालची निवडणूक जिंकून ममता यांनी हे सिद्ध केले की राज्यात त्यांच्यापेक्षा लोकप्रिय नेता अन्य कुणीही नाही. परंतु बंगाल जिंकल्यानंतर आता ममता दिल्लीकडे कूच करतील का? कारण ममता यांनी मोदी-शहा जोडीला शह देत तिसर्यांदा बहुमत मिळवत अचानक राष्ट्रीय राजकारणात एक पाऊल टाकल्याचे दिसत आहे.
ममता विरूद्ध मोदी
या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी जर तृणमुलच्या चेहरा होत्या तर भाजपाचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. निकालानंतर प्रश्न हा उपस्थित होतो की, ममता बॅनर्जी आता भाजपाविरोधी पक्षांचे देशभरात नेतृत्व करणार का? ममता बॅनर्जी यांनाही असेच काही करायचे असल्याचे दिसते. याचसाठी त्यांनी 31 मार्च 2021 ला पश्चिम बंगालच्या निवडणुका सुरू असताना 15 पक्षांना पत्र लिहून एकत्र येण्याचे आवाहन केले होते. ममता बनर्जी यांनी लिहिले होते, मला वाटते की, लोकशाही आणि संविधानावर भाजपा हल्ला करत असून याविरूद्ध एकजुट आणि प्रभावी संघर्षाची वेळ आली आहे. ममता यांनी हे पत्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.
अगोदर सुद्धा केला होता प्रयत्न
मोदी विरोधकांना एकत्र आणण्याचा त्यांचा हा पहिला प्रयत्न नव्हता. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी 22 पक्षांच्या 24 नेत्यांना एका मंचावर आणून विरोधी पक्षांची एकजुट करण्याचा प्रयत्न केला होता. ममता बॅनर्जी यांच्या निमंत्रणावरून समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांच्यापासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यापर्यंत अनेक नेते उपस्थित राहिले होते.
ममता बनू शकतात का विरोधी पक्षांच्या सर्वसंमत नेत्या?
आता प्रश्न हा आहे की, पश्चिम बंगाल तिसर्यांदा जिंकून ममता बॅनर्जी आपले काम आणखी पुढे वाढवतील का? विरोधी पक्षांकडून त्या मोदींना थेट आव्हान देतील का?, कारण विरोधी पक्ष विखुरलेले आहेत. काँग्रेसचे अंतर्गत मतभेद सुरू आहेत. शरद पवार असोत किंवा मायावती-अखिलेश, उद्धव ठाकरे असोत किंवा चंद्र बाबू नायडू, विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्यामध्ये थेट मोदींना टक्कर देण्याचे सामर्थ्य सध्यातरी दिसत नाही. अशावेळी ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या सर्वसंमत नेत्या होऊ शकतात का? हा मोठा प्रश्न आहे.
ज्योती बसू यांच्याशी ममतांशी तुलना
बंगालमध्ये ममता यांची तुलना आता ज्योती बसु यांच्याशी होत आहे. ज्यांच्या नेतृत्वात डाव्यांनी पश्चिम बंगालमध्ये 23 वर्षे राज्य केले. डाव्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचे अशक्य काम करणार्या ममता होत्या. ज्या 2011 पासून पश्चिम बंगालमध्ये सरकार चालवत आहेत आणि तिसर्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत.
भाजपा दिले कडवे आव्हान
भाजपाने बंगाल जिंकण्यासाठी ममता सरकारवर मुस्लिम तुष्टिकरण, घुसखोरीला प्रोत्साहन यासारखे गंभीर आरोप केले परंतु ममता यांनी बंगाली गौरव आणि संस्कृतीच्या शस्त्राने भाजपाचे ध्रुवीकरणाचे प्रयत्न हाणून पाडले. हे दाखवून दिले की, भाजपाला थेट टक्कर देणे फार अवघड नाही. अशावेळी अन्य राज्यात विरोधी पक्ष ममता यांची रणनिती आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारू शकतात. अशावेळी हा सुद्धा प्रश्न आहे की, मोदींना हटवण्यासाठी काँग्रेस आपल्या महत्वकांक्षा मर्यादित करेल का?
भाजपाला 2024 मध्ये बसू शकतो मोठा झटका
मागील निवडणुकीत युपी, बिहारसह उत्तर भारताच्या बहुतांश राज्यात भाजपाने मोठे यश मिळवले होते. भाजपाला वाटते की, पुढील निवडणुकीत येथे सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. यासाठी बंगाल त्यांच्या केंद्रस्थानी होते, परंतु विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपासाठी पश्चिम बंगालच्या 42 जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकणे अवघड होईल कारण विजयाने उत्साहित तृणमूल काँग्रेस आणखी जास्त आक्रमकपणे पुढे येईल. ज्यामुळे भाजपाला 2024 च्या निवडणुकीत झटका बसू शकतो.