धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, स्वतःही विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीच्या गळ्यावर कत्तीने वार करून खून केला. परळी तालुक्यातील बोधेगाव येथे सोमवारी (दि. 16) ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्ञानेश्‍वरी धनराज ऊर्फ योगीराज सोनवर (वय 27) असं मयत माहिलेचे नाव आहे. तर धनराज सोनवर असे विष प्राशन केलेल्या पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षापूर्वी परळी तालुक्यातील बोधेगाव येथील ज्ञानेश्वरीचा विवाह केज तालुक्यातील होळ येथील धनराज यांच्यासोबत झाला होता. दोन महिन्यापूर्वी ज्ञानेश्वरीचा औरंगाबादमध्ये पडून पाय मोडला होता. त्यामुळे ती दोन महिन्यापासून बोधेगाव येथे माहेरी राहत होती. तू गेल्या दोन महिन्यांपासून नांदायला का येत नाहीस, असे विचारत पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली. त्यानंतर त्याच्या हातात असलेल्या कत्तीने ज्ञानेश्‍वरीच्या गळ्यावर व मानेवर वार करून तिला ठार मारले.

पत्नीचा खूनानंतर आरोपी पतीने स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. धनराज सोनवर याच्या विरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे तपास करत आहेत.