‘ब्लाइंड डेट’साठी ती 23 जणांना घेऊन आली, 2 लाखांचं बिल पाहून प्रियकर क्षणार्धात ‘गायब’

बीजिंग : वृत्तसंस्था –   चीनमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. या ठिकाणी एक तरुण आपल्या प्रेयसीबरोबर डेटवर गेला होता. मात्र, डेटनंतर हॉटेलचे बिल भरण्याऐवजी या तरुणाने तेथून पळ काढला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तरुणाने असे का केलं. तर या मुलाची प्रेयसी डेटवर येताना आपल्या 23 मित्र मैत्रिणींना घेऊन आली होती. या सर्वांच्या खाण्याचं एकूण बील हे दोन लाखांहून अधिक झाले. बिलाची रक्कम पाहून प्रियकर तरुणाने तेथून पळ काढला. विशेष म्हणजे हे दोघे एकमेकांना केवळ फोन कॉल आणि सोशल नेटवर्किंगवरुन ओळखत होते आणि ते पहिल्यांदाच ब्लाइंड डेटसाठी प्रत्यक्षात भेटले होते.

ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीने हा तरुण कीती उदार आहे हे जाणून घेण्यासाठी ब्लाइंड डेटला आपल्या 23 मित्रांना बोलावल्याचे समजतय. या सर्वांना पाहून त्या तरुणाला थोडा धक्का बसला मात्र नंतर हॉटेलचे बिल पाहून तो घाबरला आणि त्याने तेथून पळ काढला. डिनर डेटनंतर सर्वांचे जेवण झाल्यावर बिल देण्याची वेळ आली तेव्हा माझ्या प्रियकराने तिथून पळ काढला होता. त्यानंतर या मुलीनेच आपल्या मित्रांचे 19800 युआन म्हणजेच अंदाजे 2 लाख 17 हजार 800 रुपयांचे बिल भरलं.

समोर आलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार चीनच्या पूर्वेला असणाऱ्या झेजियांग प्रांतात घडला. या ठिकाणी राहणाऱ्या लियू नावाच्या 29 वर्षीय तरुण आपल्या आईच्या सांगण्यावरुन सोशल मीडियावरुन तरुणीची ओळख वाढवून या ब्लाइंड डेटला गेला होता. या दोघांचीही यापूर्वी कधीच भेट झाली नव्हती. मात्र, हॉटेलचे बिल पाहून लियूने तेथून पळ काढला डिनरनंतर मुलीने लियूला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो आऊट ऑफ रिच होता. अखेर या मुलीलाच बिलाची रक्कम द्यावी लागली.

बिलाची रक्कम भरून हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर मुलीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन लियू विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस लियूचा शोध घेतला. पोलिसांनी ताब्याात घेतल्यानंतर लियूने दोन टेबलचे बिल भरण्याची तयारी दर्शवली. त्यानंतरही या मुलीला 15 हजार 402 युआन म्हणजेच 1 लाख 69 हजारापेक्षा अधिक बिल भरावे लागले. चीनमधील सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी या मुलाची बाजू घेतली असून मुलीने केलेला हा प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे.