पत्नी अन् घरातील नातेवाईकाचा कोयत्यानं सपासप वार करून खून

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन –  पत्नीसह घरी आलेल्या नातावेईकाचा अज्ञात कारणावरुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील खुटवाब येथील मटकाळा हद्दीत उघडकीस आली आहे. निर्जनस्थळी असलेल्या या ठिकाणी आरोपीने पत्नी आणि नातेवाईकाचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या वेळी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. तसेच दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

खुटबाव गावच्या हद्दीत असणाऱ्या नवा मुठा उजवा कालव्यानजीक हे आदिवाशी कुटुंब एका पालासारख्या झोपडीत रहात होते. गुरुवारी या कुटुंबातील मंगेश जाधव हा पाहुणा मुक्कामी आला होता. त्यांच्यात रात्री कोणत्यातरी करणावरून वाद झाले होते. याच वादातून चिडलेल्या आरोपीने त्याची पत्नी आणि पाहुण्याचा बांबू आणि कोयत्याने सपासप वार करून खून केला.

घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करत असून त्यांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवून दिले आहेत. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचा तपास पोलीस करत आहेत.