माझ्या मुलांना आरक्षण द्या …! औरंगाबाद येथे मराठा आरक्षणावरून तिसरी आत्महत्या 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. काल दिनांक ९ ऑगस्ट रोजी  राज्यभरात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाचा पहिला बळी म्हणजे औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या मराठा आंदोलकांची जलसमाधी. त्यानंतर औरंगाबाद मध्येच आणखी दोन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यातील जगन्नाथ सोनावणे यांना देखील आपला जीव गमवावा लागला. आता औरंगाबाद यथील आणखी एका व्यक्तीने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या कारणावरून आत्महत्या केली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथील विजयनगर येथील कारभारी शेळके (४३) असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली . शेळके यांनी घरातील  लोखंडी अँगलला  गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेळके यांनी आत्महत्येआधी एक चिठ्ठी लिहीली होती. यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

माझ्या मुलांना आरक्षण द्या

शेळके यांच्या घरातून एक चिठ्ठी सापडली आहे.  यात नमूद केलेल्या  माहितीनुसार, शेळके यांच्यावर श्रीराम फायनान्सचे २ लाखांचे कर्ज होते. या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षण आणि श्रीराम फायनान्सकडून कर्ज वसुलीसाठी होत असलेल्या दबावामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्या मरणानंतर माझ्या मुलांना आरक्षण द्या अशी मागणी शेळकेंनी चिठ्ठीत केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर आज ही घटना घडल्याने विजयनगर येथे मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा  फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.