जेवताना मटणाची हाड्डी घशात अडकल्याने गमावला जीव

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – नवरात्रीचा उपवास संपल्यानंतर अनेकजण मांसाहारावर ताव मारतात. त्यातच नवरात्री समाप्तीनंतर लगेचच रविवार आल्याने अनेकांनी मटण, चिकन, मच्छीवर ताव मारत नऊ दिवसांची कसर भरून काढली. मात्र, अशाच प्रकारे मांसाहाराचा आस्वाद घेताना गळ्यात हाड्डी अडकल्याने एका चाळीस वर्षांचा व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना अमरावतीच्या फेजपुरामध्ये घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव विनोद वाघमारे आहे.

नंदकिशोर विश्वास तायडे (४५,रा.वडाळी) यांच्या तक्रारीवरून फेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नंदकिशोर तायडे यांचा भाचा विनोद वाघमारे हा कामावरून घरी आला होता. रात्री ८ वाजता जेवण करत असताना विनोदच्या गळ्यात मटणाची हाड्डी अडकली. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी विनोदला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानंतरच विनोदच्या मृत्यूचे निश्चित कारण उघड होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे म्हणजे विकृतीच : अच्युत गोडबोले

बुलडाणा : जीव धोक्यात घालून सेल्फी घेणे म्हणजे विकृती असल्याचे अच्युत गोडबोले यांनी सांगितले. अशा पध्दतीने सेल्फी घेण्याला विकृती म्हणू शकतो का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अच्युत गोडबोलेंनी यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब येथे ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई-गोवा क्रूज शिपच्या उद्घाटन कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी क्रूझवरील सर्वात वरच्या भागावर जाऊन टोकावर बसून सेल्फी काढला. त्यांच्या या सेल्फीने सोबत असलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले होते. अमृता फडणवीस यांच्या या सेल्फीची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू असून अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.